लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 7 मे ला देशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. राज्यातही महत्वाच्या मतदारसंघात या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विशेषत पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघात या दिवशी मतदान होणार आहे. त्यादृष्टीनं देशातील बड्या नेत्यांच्या महाराष्ट्रात सभा होत आहेत.
दरम्यान पुण्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदानासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे पुण्यात बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर आता आज काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांची ही सभा पुण्यात होत आहे. आज पुण्यात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
पुणे लोकसभा मतदारंघातून काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिलीय. या दोघांमधील ही लढत अत्यंत महत्वपूर्ण मानली जातेय. दोन्ही उमेदवारांनी बड्या पुण्यात नेत्यांच्या सभांचा धडाका लावला आहे. त्यामुळं पुण्यातील लोकसभेच्या निवडणुकीत रंगत निर्माण झालीय.