काँग्रेस नेते राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदी संतापले; भर सभेतून दिला इशारा
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदी संतापले; भर सभेतून दिला इशारा
img
Dipali Ghadwaje
भारत जोडो न्याय यात्रेची रविवारी (ता. १७) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मुंबईत सांगता झाली. यावेळी शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या सभेतून त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. आमची लढाई भाजपा किंवा कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. हिंदू धर्मात 'शक्ती' शब्द आहे, या शक्तीविरोधात आम्ही लढतोय, असं विधान राहुल गांधी यांनी केलं. त्यांच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संताप व्यक्त केला आहे.   

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा दौऱ्यावर असून त्यांनी जगतियाल येथे जंगी सभा घेत शक्तिप्रदर्शन केलं. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. माझ्यासाठी प्रत्येक आई आणि मुलगी शक्तीचे रुप असून मी त्यांची शक्ती म्हणून पूजा करतो. मी भारतमातेचा उपासक आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी याचं आव्हान मी स्वीकारले असून या शक्तीस्वरूप माता-भगिनींच्या रक्षणासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य घालवणार असून वेळ पडली तर जीवही धोक्यात घालेन, असं खुलं आव्हान देखील मोदी यांनी राहुल गांधी यांना भर सभेत दिलं.

एका बाजूला शक्तीचा नाश करणारे लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला शक्तीची पूजा करणारे लोक आहेत. शक्तीचा नाश कोण करू शकतो आणि शक्तीचा आशीर्वाद कोणाला मिळू शकतो याची हे ४ जूनला सर्वांना कळेल, असंही पंतप्रधान मोदींनी भर सभेतून ठणकावून सांगितलं आहे.


राहुल गांधी काय म्हणाले होते?
मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेतून राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही सर्व मोदींविरोधात लढत आहोत, असं म्हटलं जातंय. पण, आमची लढाई एकाही व्यक्तीच्या विरोधात नसून, हिंदू धर्मात शक्ती शब्द आहे. आम्ही या शक्तीविरोधात लढत आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group