काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या सामान्य जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न ऐकत आहेत. भारत जोडो यात्रेमधून त्यांनी अनेक सामान्य जनतेशी संवाद साधला. अशात आता राहुल गांधी हमालाच्या गणवेशात दिसले आहेत. त्यांनी हमालांशी बातचीत करत त्यांचे प्रश्न समजून घेतलेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज सकाळी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी त्यांनी येथील रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या हमालांची भेट घेतली. त्याच्याशी संवाद देखील साधला. राहुल गांधी यांनी यावेळी हमालांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेतली.
राहुल गांधी कायमच त्यांच्या वक्तव्यांसह अनेक गोष्टींमुळे चर्चेचा विषय ठरतात.आज राहुल गांधी दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवर पोहचले होते. येथे आल्यावर त्यांनी सर्व हमालांशी बातचीत केली. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. इतकेच नाही तर राहुल गांधींनी हमालांना आपलेसे वाटावे म्हणून त्यांचा पोशाख परिधान केला. तसेच काही सामान देखील उचलले.
राहुल गांधी यांनी स्वत: त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यांनी यावर काही फोटो शेअर केलेत. यातील एका फोटोत राहुल गांधी लाल रंगाचा हमालांचा पोशाख आणि डोक्यावर एक सुटकेस घेऊन जात आहेत. दरम्यान राहुल गांधी यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.