मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेता आणि ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार , पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर रवी राजा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारंसघातून काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिल्याने रवी राजा प्रचंड नाराज होते. याच नाराजीतून रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे सांगितले जाते.
रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. त्यांची मुंबईतील अनेक आंदोलने चर्चेचा विषय ठरली आहेत. एकूण रवी राजा हा मुंबईतील काँग्रेसचा सक्रिय आणि जमिनीवर उतरून काम करणारा कार्यकर्ता होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी रवी राजा यांचा राजीनामा हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.