भाजप - काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर, आझाद मैदान पोलीस ठाणे परिसरात राडा, नेमकं काय घडलं?
भाजप - काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर, आझाद मैदान पोलीस ठाणे परिसरात राडा, नेमकं काय घडलं?
img
दैनिक भ्रमर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापल्याचे  दिसतेय. भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनानंतर काँग्रेस कार्यकर्ते आझाद मैदान पोलीस ठाण्याबाहेर जमले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसकडून भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर भाजप कार्यकर्तेदेखील आक्रमक होताना दिसले. आझाद मैदान पोलीस ठाण्यात भाजपच्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते देखील पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तापलं.

आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये भाजप कार्यकर्ते जमा झाले. यावेळी स्थानिक पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाणे परिसरात थांबू नये, असे निर्देश स्थानिक डीसीपींनी दिला. भाजप कार्यकर्त्यांनी मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना आणि इतर भाजपा कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये नेण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आझाद मैदान पोलीस ठाणे परिसरात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलीस ठाण्याचा गेट बंद, बाहेर कडेकोट बंदोबस्त आझाद मैदान पोलीस ठाणे परिसरात हंगामा बघायला मिळाला. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांनी पोलीस ठाण्याचा गेट बंद केला. तसेच पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून सर्व घटनेकडे बारकाईने लक्ष आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे.


 नेमकं काय घडलं ? 

मुंबईत भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात घुसण्याचा आणि कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत लाठीचार्ज केला. पोलिसांनी आंदोलक भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. तसेच काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे या घटनेनंतर काँग्रेसदेखील आक्रमक होताना दिसत आहे  काँग्रेसकडूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा दाखला देत भाजपवर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे काँग्रेस कार्यालय परिसरात झालेल्या गदारोळानंतर आता मुंबईत आझाद मैदान पोलीस ठाण्याबाहेर मोठा गोंधळ बघायला मिळाला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group