उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी भावूक झाल्या. जनतेला भावनिक आवाहन करत त्या म्हणाल्या की, मी माझा मुलगा जनतेसाठी समर्पित करत आहे, तो तुमचाच असून आपला म्हणून सांभाळून घ्या. तुमच्या प्रेमाने मला कधीच एकटे वाटू दिले नाही. आमच्या कुटुंबाच्या आठवणी रायबरेलीशी जोडलेल्या आहेत. आज खूप दिवसांनी मला तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळाली याचा मला आनंद वाटतो. मी मनापासून तुमची ऋणी आहे. माझे डोके तुमच्यापुढे कायम आदराने झुकले आहे.
रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गांधी यांच्या प्रचारसभेसाठी सोनिया गांधींची उपस्थिती होती. यावेळी पुत्रासाठी सोनिया गांधी भावुक झाल्याचं बघायला मिळालं.
रायबरेलीमध्ये बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, मी माझा मुलगा तुमच्या स्वाधीन करत आहे, तुम्ही जसं मला तुमचं म्हणून सांभाळलं तसं राहुलला सांभाळा. राहुल तुम्हाला निराश करणार नाही, याची मी खात्री देते, अशा भावना सोनिया गांधींनी व्यक्त केल्या.
‘‘ गांधी कुटुंबाकडून मला जी शिकवण मिळाली तीच मी राहुल आणि प्रियांका यांना दिली. सर्वांचा आदर करा, एखाद्या कमकुवत घटकासाठी लढायची वेळ आली तर लढा. संघर्षाची तुमची पाळेमुळे आणि परंपरा या मजबूत आहेत. मी तुम्हाला माझा मुलगा सोपवित आहे. जसे तुम्ही मला आपले मानले तसेच राहुलला देखील आपले माना. राहुल तुम्हाला कधीच निराश करणार नाही,’’ असे भावुक उद्गार काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी काढले. त्या येथे आयोजित सभेत बोलत होत्या. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव देखील या सभेमध्ये सहभागी झाले होते.
पुढे बोलताना सोनिया म्हणाल्या, ‘‘बऱ्याच दिवसांनंतर मला तुमच्यात येण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. खासदार या नात्याने मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. ते माझ्यासाठी खूप मोठे भांडवल आहे. गेल्या शंभर वर्षांपासून आमच्या घराण्याची पाळेमुळे ही या मातीशी जोडल्या गेली आहेत. इंदिरा गांधी यांच्या मनात रायबरेलीसाठी वेगळे स्थान होते. त्यांचे तुमच्यावर अतिव प्रेम होते.’’