भाजप खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .काँग्रेस नेते पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक आंदोलनानंतर पोलिसांनी बोंडे यांच्याविरोधात कारवाई केली. भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जीभेला चटके देण्याची भाषा केली. या वादग्रस्त वक्तव्यावरून अखेर अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
दरम्यान , काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर, खा. बळवंत वानखेडे, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बब्लू देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम १९२ , ३५१(२), ३५६(२) या कलमांतर्गत अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. बोंडे यांचे विधान समाजामध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेष निर्माण करून त्यांच्यावर लोकमानसातून हल्ला व्हावा याकरिता उद्युक्त करणारे आहे. अनिल बोंडेंच्या वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अनिल बोंडे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली
भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत कारवाई करण्यासाठी अमरावतीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अनिल बोंडेंवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना गराडा घालण्यात आला.
अनिल बोंडे हे गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, काँग्रेसच्या नेत्यांविरोधात हल्ले व्हावेत, असा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचा तात्काळ अटक करावी, असे ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.