“पंतप्रधान नरेंद्र मोदीच फक्त राहुल गांधींची टिंगल करतात
“पंतप्रधान नरेंद्र मोदीच फक्त राहुल गांधींची टिंगल करतात" नेमकं काय म्हणाले शरद पवार? वाचा
img
Dipali Ghadwaje
राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आत्तापर्यंत अनेकदा भाजपा नेत्यांनी विविध प्रकारे टीका केली आहे. तसंच त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीका केली आहे. पण शरद पवार यांनीच एका मुलाखतीत आता राहुल गांधी हे राजकारणाबाबत गंभीर आहेत असं म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदीच फक्त त्यांची टिंगल करतात असंही म्हटलं आहे. महाविकास आघाडी आणि लोकसभा निवडणुकीबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

“भाजपाला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या तर देशातील समविचारी पक्षांना एकत्र आणून आम्ही देशाला एक स्थिर सरकार देण्याचा नक्कीच प्रयत्न करू”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार म्हणाले, 

“यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांपेक्षा कमी जागा मिळतील. महाराष्ट्रातील त्यांच्या जागा कमी होतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मिळून महाराष्ट्रात केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी त्या जागा वाढणार आहेत.” 

राहुल गांधी यांच्याबाबत काय म्हणाले शरद पवार?
“राहुल गांधी यांचा दृष्टीकोन आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा दृष्टीकोन बदलला आहे. २०१९ नंतर त्यांनी जी यात्रा वगैरे काढली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्याकडे नेतृत्व लगेच जाईल असं नाही. पण एकत्रित काम करता येऊ शकतं. त्यांच्या नेतृत्वाच्या शैलीत काही चांगले बदल झाले आहेत. राहुल गांधींचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक गंभीर आहे. त्यांनी जी पदयात्रा काढली, लोकांच्या भेटी घेतल्या, महिला, तरुण, बेरोजगार, दलित, शेतकरी या सगळ्यांना ते भेटले. यातूनच ते राजकारणाबाबत गंभीर आहे असं दिसतं. याआधी ते राजकारणाबाबत गंभीर नाहीत अशी चर्चा व्हायची.” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानच राहुल गांधींची टिंगल करतात पण बहुसंख्य वर्ग..

“एकटे पंतप्रधानच असे आहेत जे राहुल गांधींची टिंगल, टवाळी करतात. त्यांना शहजादे वगैरे म्हणतात. पंतप्रधानांचा हा अपवाद सोडला तर राहुल गांधींकडे बहुसंख्य वर्ग गांभीर्याने पाहतो आहे. ही जमेची बाजू आहे असं म्हणता येईल.”
इतर बातम्या
Join Whatsapp Group