नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेसाठी जगभरातील राष्ट्रांचे प्रमुख नेते आले असल्याने नवी दिल्लीचे रुप बदलले आहे. ९ आणि १० सप्टेंबर रोजी देशातील विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रंगरंगोटी, डागडुजी, साफसफाईचे काम करण्यात आले आहे. अनेक स्थळांना नवा साज देण्यात आला असून सर्वत झगमगाट दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
देशातमध्ये जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर २० देशांचे राष्ट्र प्रमुख, ९ अस्थायी सदस्य देशांचे प्रमुख आणि १४ आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख यांनी उपस्थिती लावली आहे. तसेच त्यांच्यासोबत जवळपास ५०० लोकांचे शिष्टमंडळ भारतात आले आहे. परदेशी नेत्यांची नवी दिल्लीत सर्वप्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक प्रमुख नेत्यांच्या राहण्यासाठी स्वतंत्र हॉटेल बुक करण्यात आले आहेत. दिल्लीच्या एनसीआर भागात सामान्य लोकांच्या येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सर्वत्र कडेकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
दरम्यान केंद्र सरकारने नवी दिल्लीमध्ये चोख खबरदारी घेतली असून पाहुण्यांना भारतातील गरिबीचे दर्शन होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच दिल्लीतील प्राण्यांवर (माकड, गुरे) लक्ष ठेवण्यासाठी लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरुन राहुल गांधींनी टीका केलीये. केंद्र सरकार आपल्या गरीब लोकांना आणि प्राण्यांना लपवत आहे. पाहुण्यांपासून भारताचे खरे रुप लपवण्याची काही गरज नाही, असं ते म्हणाले आहेत.