पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. महिला मेळाव्याचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह संपूर्ण राज्य मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. विदर्भातील १० लोकसभा मतदारसंघ डोळ्यांसमोर ठेऊन या सभेचं आयोजन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज यवतमाळच्या भारी येथे होणाऱ्या सभेला दोन लाखांहून अधिक महिला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंत झालेल्या सभांमधील सर्वात मोठा सभा मंडप यवतमाळमध्ये उभारण्यात आला आहे. हा मेगा इव्हेंट ४७ एकर पसरलेल्या विस्तीर्ण भागावर होणार असून, पंतप्रधानांचे भाषण दुपारी ४ वाजता होणार आहे.
दरम्यान या सभेसाठी नागपुरात राहुल गांधी यांच्या सभेसाठी वापरलेल्या खुर्च्या आल्या आहेत. त्यात राहुल गांधी यांचा फोटो असून स्कँन टू डोनेट असे या स्टिकर्सवर लिहिले आहे. त्यामुळे राज्यात हा चर्चेचा विषय बनला असून सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली असून सभा नेमकी मोदींची की राहुल गांधींची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मात्र व्यवस्थपकांच्या हे लक्षात आल्यानंतर खुर्च्यांवरील राहुल गांधींचा फोटो हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार या भागात नुकताच काँग्रेसची सभा झाली. त्यामुळे त्या कार्यक्रमासाठी राहुल गांधींचे फोटो खुर्च्यांवर चिकडवले होते. मात्र, ज्या ठेकेदाराने त्या खुर्च्या काँग्रेसच्या मेळाव्याला पुरवल्या, त्याच खुर्च्या भाजपच्या कार्यक्रमाला पाठवल्या. त्यामुळे कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला असून याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.