लोकसभेच्या निकालानंतर राजधानी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेसाठी मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाकडेही स्पष्ट बहुमताचा आकडा नसल्याने नेमकं सत्तेच्या सारीपाटात कोण जिंकणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
"राज्यात काल आलेल्या निकालात काँग्रेसने बाजी मारत राज्यात सर्वात जास्त सीट निवडून आणल्या आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेसचं मोठा भाऊ ठरला आहे. देशात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली. या यात्रेत जनतेला गॅरंटी दिली याचा विश्वास जनतेने दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने मोदी विरूध्द जनता अशी लढाई होती. यात जनतेचा विजय झाला आहे," असे नाना पटोले म्हणालेत. तसेच "देशात दोन दिवस खूप घडामोडी घडणार आहे. यात इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात बनणार आहे. फॉर्म्युला तयार आहेत ते सांगायचे नसतात," असा सर्वात मोठा दावाही नाना पटोले यांनी केला. नाना पटोले यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.