दिल्लीतुन एक मोठी बातमी सामोरं आली आहे. सुप्रिम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अवघ्या ४९व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर कायदा क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं ?
सिद्धार्थ शिंदे यांना सोमवारी न्यायालयात अचानक भोवळ आली. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रूग्णालयात नेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांनी प्राण सोडले. माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू असलेले सिद्धार्थ शिंदे यांची राज्यात वेगळीच ओळख होती. 
ते फक्त वकील नसून, कायद्याचे विश्लेषणसुद्धा ते सोप्या भाषेत सामान्यांना समाजावून सांगायचे. मराठा आरक्षण असो किंवा राज्यातील सत्तासंघर्ष, यांसारख्या महत्वाच्या सुनावण्यांवेळी त्यांनी सुप्रिम कोर्टातील युक्तिवाद आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या अकाली निधनानंतर कायद्याच्या क्षेत्रात अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.