राजधानी दिल्ली मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने ८ ते ९ शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल पाठवला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिस, बॉम्बशोधक पथक, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सर्व शाळांमध्ये पोहोचल्या आहेत. बॉम्बचा शोध सुरू आहे. ईमेल पाठवणाऱ्याचाही शोध घेतला जात आहे.
बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. यापार्श्वभूमीवर काही शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.
शाळांमध्ये खरंच बॉम्ब ठेवले आहेत का? याची कसून तपासणी केली जात आहे. बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी पोहचलं आहे. यामध्ये द्वारकाच्या डीपीएस, मयूर विहारच्या मदर मेरी स्कूल आणि नवी दिल्लीच्या संस्कृती स्कूलसारख्या हायप्रोफाइल शाळांचा समावेश आहे.
सर्वात आधी द्वारका येथील हायप्रोफाइल डीपीएस शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. अग्निशमन विभागाला सकाळी ६ वाजता याची माहिती देण्यात आली. त्यानंतर दिल्ली पोलीस, बॉम्ब निकामी पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण शाळेची झडती घेण्यात आली.
त्यानंतर पूर्व दिल्लीतील मयूर विहार येथील मदर मेरी स्कूललाही धमकीचा ईमेल आला. त्यामुळे संपूर्ण शाळा रिकामी करून शोध घेतला जात आहे. नवी दिल्ली येथील संस्कृती शाळेलाही ईमेलद्वारे अशीच धमकी मिळाली आहे. शाळेत बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर संपूर्ण शाळा रिकामी करण्यात आली.
दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या बॉम्बचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. बॉम्बच्या बातम्यांमुळे दिल्लीतील ८ मोठ्या शाळांमध्ये घबराट पसरली आहे. सध्या शाळेचा परिसर रिकामा करून शोध घेतला जात आहे. हा धमकीचा ई-मेल नेमका कुणी पाठवला? याबाबतही शोध घेतला जात आहे.