ओला आणि उबर सारख्या बड्या कंपन्यांना आता तगडी फाईट बसणार आहे. या बड्या कंपन्यांना फाईट देण्यासाठी १ जानेवारी २०२६ पासून 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi) हे नवीन ॲप लाँच होणार आहे. सहकारी मॉडेलवर आधारित असलेले हे ॲप प्रवासी आणि ड्रायव्हर्स या दोघांसाठीही अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचं बोललं जात आहे.
प्रवाशांसाठी या ॲपचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'पीक आवर्स'मध्ये होणाऱ्या अनियंत्रित भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणं हे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्यानं अनेक सेफ्टी फीचर्स या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. तर ड्रायव्हर्सना एकूण भाड्याचा ८० टक्क्यांहून अधिक हिस्सा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकूणच, दिल्लीतील प्रवाशांना सुरक्षित आणि रास्त दरात प्रवास करण्याची संधी १ जानेवारीपासून मिळणार आहे. टप्प्याटप्प्यानं हे अॅप देशभरात लाँच केलं जाईल.
भारत टॅक्सी ॲप हे 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड'द्वारे चालवले जाईल. हे मॉडेल दिल्लीच्या टॅक्सी क्षेत्रात मोठे बदल घडवून आणेल आणि जिथे ड्रायव्हर व प्रवासी या दोघांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असा दावा केला जात आहे. या ॲपद्वारे कारसोबतच ऑटो आणि बाईक सेवा देखील पुरवली जाणार आहे. दिल्लीत या ॲपची चाचणी पूर्ण झाली असून आतापर्यंत सुमारे ५६ हजार ड्रायव्हर्सनी आपली नोंदणी केली आहे. दिल्लीनंतर गुजरातच्या राजकोटमध्येही याची चाचणी सुरू असून तिथे १ फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.