दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून यात अनेक जण जखमी आहे. या प्रकरणाचा सध्या एजन्सींकडून कसून तपास सुरू आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणात आता आणखी मोठी माहिती समोर आली आहे.
दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद याचे पुलवामा येथील घर सुरक्षा यंत्रणांनी आयईडीने उडवून दिले आहे. दहशतवादविरूद्धच्या कारवाईचा एक भाग म्हणून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. तसेच डॉ. उमरचे घर उडवले. मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण कारवाई नियंत्रित पद्धतीने पार पडली.
गुरूवारी फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये या स्फोटाशी संबंधित आणखी एक कार आढळली. पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार डॉ. शाहिन शाहिद यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. ज्याला आधीच 'व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल' प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
डॉ. उमर आणि त्याचे साथीदार बऱ्याच काळापासून या स्फोटाची योजना बनवत होते, तपास यंत्रणांच्या चौकशीत हे समोर आलय. तपास यंत्रणांकडून स्फोटात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांविरोधात वेगवेगळ्या प्रकारची कारवाई सुरु आहे. याच कारवाई अंतर्गत दहशतवादी उमरच घर जमीनदोस्त करण्यात आलं.