गोव्यातील हडपडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबमध्ये झालेल्या अग्नितांडवात २५ निष्पाप नागरिकांची जीव गमावला. या घटनेनंतर देशभरातून संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात आली. तर, याप्रकरणातील क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा हे घटनेनंतर फरार झाले होते. त्यानंतर, गोवा पोलिसांकडून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. इंटरपोलने भावांविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली असून गोवा पोलिसांनी त्यांचे पासपोर्टही निलंबित केले होते.
क्लबमधील अग्नितांडवानंतर थायलंडमध्ये पसार झालेल्या लुथरा बंधूंविरुद्ध थायलंड सरकारने हद्दपारीची प्रक्रीया पूर्ण केली. त्यानंतर सोमवारी दोन्ही आरोपींचे भारतीय दूतावासाकडे हस्तांतरण करण्यात आले. लुथरा बंधूंना ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले होते, तिथे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून गोवा पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर आता त्यांना गोव्यात आणण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही बंधू थायलंडला पळून गेले होते. मात्र, अखेर या नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन्ही लुथरा बंधूंना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी दिल्लीतून दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर आता गोव्यातील मोपा विमानतळावरून गोव्यात आणले आहे. याप्रकरणी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारणा केली असता, प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.