नवी दिल्ली : शाळेचे विद्यार्थी असलेल्या बसला भीषण आग लागल्याची धक्कदायक घटना नुकतीच समोर आली आहे. थायलंडमध्ये शाळेच्या बसला आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत २५ विद्यार्थी आणि शिक्षकांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेने थायलंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मंगळवारी शाळकरी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक बसने सहलीला निघाले होते. याच बसला अचानक आग लागली. या बसला लागलेल्या आगीच्या धुरात अनेक जण अडकले. या बसच्या आगीत २५ विद्यार्थ्यांसहित शिक्षक होरपळले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. यानंतर काही विद्यार्थ्यांना रेस्क्यू करण्यात आलं. थायलंडचे परिवहन मंत्री सुरिया जुंगरुंगरुएंगकित यांनी घटनेची खात्री केली आहे. या बसमध्ये एकूण ४४ जण प्रवास करत होते. बसमधून १९ जणांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलं. तर बाकीचे लोक या बसमध्ये अडकले. त्यामुळे बसमधील उर्वरित लोकांचा होरपळून मृत्यू झाला, असं सांगण्यात येत आहे.
बसमधील शाळकरी विद्यार्थी आणि शिक्षक हे राजधानी बँकॉकहून अयुत्थाया येथे जात होते. त्याचवेळी पथुम थानी प्रांतात ही भयंकर घटना घडली. दुपारच्या सुमारास ही आगीची घटना घडली. या दुर्घटनेत नेमके किती जणांचा मृत्यू झाला? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
या बसमधील एकूण वाचलेल्या विद्यार्थ्यांवरून २५ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावला जात आहे. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अचानक बसला आग लागून विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबावर शोककळा पसरली आहे.