नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- येथील सुभाष रोड, टाऊन हॉल समोर असलेल्या एका बॅटरीच्या दुकानाला आग लागली. तिची झळ शेजारी असलेल्या दुकानाला लागल्याने एकूण चार दुकाने जळून खाक झाले.
अग्निशमक दलाने आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले.
आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली होती. ही आग बाजूच्या दुकानांमध्ये पसरली. त्यामुळे जवळ असलेले बॅटरी चार्जिंगचे दुकान जळून खाक झाले. तसेच बाजूला असलेल्या एका बारदानाच्या दुकानामध्ये सुद्धा आग पसरली.
सुदैवाने तातडीने दुकानातील बारदान व इतर वस्तू काढल्याने आग बाजूला पसरली नाही. मात्र काही प्रमाणात बारदान जळून खाक झाले. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला इमारतीचे असलेले साहित्य त्यामध्ये बेड, दरवाजे तसेच मोठ्या प्रमाणात फर्निचर होते मात्र तातडीने हे फर्निचर रस्त्याच्या बाजूला हटविण्यात आल्याने सुदैवाने आगीपासून हे साहित्य बचावले.
दरम्यान आग लागल्याचे समजताच तातडीने अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या आगीमुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच आग लागल्याचे समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पोलीस बंदोबस्त वाढविला.
याच महिन्यात गेल्या 6 मे रोजी येथील सुभाष रोड परिसरात असलेल्या बारदानाच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर ही आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने नऊ ते दहा दुकाने जळून खाक झाली होती. या घटनेला पंधरा दिवस होत नाही तोच याच भागात आगीचा भडका उडाला.