डोंबिवली : गेल्या काही दिवासांमध्ये डोंबिवलीतील एमआयडीमध्ये आगीच्या अनेक घटना घडत आहे. अशातच डोंबिवलीतील एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स कंपनीत आग लागल्याची घटना समोर येत आहे. यावेळी अनेक स्फोटांचे आवाजही येत असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट झाली आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेनंतर बाजूला असणाऱ्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी पाठवण्यात आलं आहे. आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. आग लागलेल्या इंडो अमाईन्स कंपनीच्या परिसरात अनेक विविध कारखाने आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. सदर घटनेनंतर परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे.