गॅस सिलिंडरच्या स्फोटात घराला आग; सुमारे 15 लाखांचे नुकसान
गॅस सिलिंडरच्या स्फोटात घराला आग; सुमारे 15 लाखांचे नुकसान
img
दैनिक भ्रमर

देवळा (भ्रमर वार्ताहर) :- देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी विक्रम श्र्ावण सावंत यांच्या  गट क्रमांक 158 या शेतातील राहत्या घरात काल सकाळी 7 वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरचा  स्फोट होऊन घराला भिषण आग लागली.

आगीत जीवितहानी झाली नाही. आगीत सर्व शासकीय कागदपत्रांसह कपाटात ठेवलेली 2 लाख 15 हजार रुपये रोख रक्कम तसेच सुमारे 3 लाख रुपयांचे  सहा तोळे सोने याशिवाय घरात ठेवलेले लग्न मंडपाचे साहित्य, घरातील सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडून सर्व जळून खाक झाले आहे. 

आगीत सुमारे पंधरा ते सोळा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  आगीची माहिती मिळताच सरपंच पौर्णिमा सावंत, पोलीस पाटील प्रल्हाद केदारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन महसूल विभागाला पंचनामा करण्यासाठी विनंती केली. त्यानुसार तलाठी आणि ग्रामसेवक यांनी भाऊराव सुखदेव सावंत, लालजी सावंत, कृष्णा सावंत, संजय पानसरे, देवा सावंत आदी पंचासमक्ष घटनेचा पंचनामा केला. आग विझविण्यासाठी गावातील असंख्य तरूणांनी प्रयत्नांची शिकस्त करत आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत सुमारे 15 ते 16 लाख रुपये  किंमतीचे  विविध प्रकारचे साहित्य आगीच्या भक्ष स्थानी पडले.

ऐन दुष्काळी परिस्थितीत एवढे मोठे नुकसान झाल्याने सदर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सध्या कडक उन्हाळा सुरु असल्याने आग विझविण्यासाठी पाण्याची कमतरता भासत होती. तरीही असंख्य तरूणांनी आणि ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group