देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीला आग लागली आहे. ही आग मोठी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवळपास २१ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्ध पातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही आग नेमकी का लागली? या मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आगीत नेमकं कितपत नुकसान झालंय? याबाबतची देखील माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण आगीचे व्हायरल झालेले व्हिडीओ हे धडकी भरवणारे आहेत.
दिल्ली अग्निशामक दलाकडून आगीच्या घटनेवर माहिती देण्यात आलीय. “आम्हाला आज दुपारी 3 वाजून 7 मिनिटांनी आयकर विभागाच्या सीआर इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही अग्निशामक दलाच्या 21 गाड्या घटनास्थळाकडे रवाना केल्या. घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि इतर कायदेशीर कामांसाठी आम्ही तातडीने तिथल्या स्थानिक पोलिसांनादेखील फोन करुन या घटेनची माहिती दिली”, अशी प्रतिक्रिया दिल्लीच्या अग्निशामक दलाकडून देण्यात आली.