मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील उच्चभ्रू लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आज (गुरुवारी) सकाळी भीषण आग लागली. कॉम्प्लेक्समधील ग्राऊण्ड प्लस एक मजली बंगल्यात ही आग भडकली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.
अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात सेकंड क्रॉस लेनमध्ये दोन बंगल्यांना भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन्ही बंगले आगीत जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील बंगला क्रमांक ११ मध्ये आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेल्याचं सांगण्यात येत आहे. बंगल्यात कुणीही राहात नव्हतं त्यामुळे जीवितहानीचा धोका टळल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. घटनास्थळावर अग्निशमन दलासोबतच रुग्णवाहिका, अदानी इलेक्ट्रिक, महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.