नाशिकरोड (प्रतिनिधी):- येथील जुन्या बिटको हॉस्पिटलला आज दुपारी आग लागली. आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड मधील बिटको हॉस्पिटल मिनी सिव्हिल हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. मनपाने या हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्या पाहता मनपाच्या राखीव जागेत भव्य हॉस्पिटल उभारले.
बिटको हॉस्पिटलचे नामकरण करून त्यास वंदनीय बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल नाव देण्यात आले. कोविड काळात हे हॉस्पिटल अनेक रुग्णांना जीवदान देणारे ठरले. त्यानंतर प्रशासनाने ऑगस्ट 2022 मध्ये जुन्या हॉस्पिटल मधून नवीन ठाकरे हॉस्पिटल मध्ये स्थलांतर केले.
मात्र जुने हॉस्पिटल बकाल अवस्थेत होते. राज्य शासनाच्या ज्यु मेडिकल कॉलेजसाठी काही काळासाठी ही जुनी इमारत भाड्याने देण्याच्या तयारीत असून त्याची प्रक्रिया शेवटच्या टप्पात आहे.
या जुन्या इमारतीच्या जुन्या डिलेव्हरी वार्डच्या मागील मोकळ्या जागेतून धुराचे लोट बाहेर येताना सुरक्षा रक्षक यांना दिसले.
त्यांनी तात्काळ धाव घेऊन घटनास्थळी पाहिले असता येथील पालापाचोळा, झाडे यांना आग लागलेली होती. त्यांनी अग्निशमक दलाला कळवल्यानंतर अग्निशमक दलाच्या एका बंबने आग विझवली. घटनेची माहिती समजताच राज्य सरकारच्या ज्यु मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. साळी ह्या घटनास्थळी पोहचल्या. अनेक मनपा अधिकारी यांनी ही पाहणी केली.
ही आग वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा जुन्या हॉस्पिटल मधील गाद्या, बेड, काही साहित्य यांचे नुकसान झाले असते.