दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अखेर स्वाती मालीवाल यांच्या मुद्द्यावर मौन सोडले आहे. आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण केल्याचा आरोप आहे. यावर दिल्ली पोलिसांनी एसआयटी देखील नेमली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी असे म्हटले आहे. मालिवाल यांच्या आरोपांबाबत भाजप आक्रमक आहे. तर मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांनी आरोप केलाय की, 13 मे रोजी सकाळी त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हजर होत्या तेव्हा मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांनी त्यांच्यावर हल्ला केला. मुख्यमंत्र्यांच्या ड्रॉईंग रूममध्ये आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी बिभव कुमारला अटक केली आहे. बिभव कुमार यांनीही पोलिसांकडे तक्रार दिली आणि सांगितले की, मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात जबरदस्तीने प्रवेश केला आणि त्यांना थांबवल्यानंतर धक्काबुक्की करण्यात आली.
योग्य तपासाची अपेक्षा – केजरीवाल
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, ‘हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्यांच्या वक्तव्याचा कारवाईवर परिणाम होऊ शकतो. पण मला आशा आहे की योग्य तपास होईल. न्याय मिळाला पाहिजे. या घटनेच्या दोन बाजू आहेत. पोलिसांनी दोन्ही पक्षांची योग्य चौकशी करून न्याय द्यावा. घटनेच्या वेळी ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी उपस्थित होते का, असे विचारले असता? केजरीवाल यांनी आपण घरी असल्याचे मान्य केले आहे. पण मी घटनास्थळी नव्हतो. असे त्यांनी म्हटले आहे. मारहाण झाली तेव्हा अरविंद केजरीवाल त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते, असा दावाही मालीवाल यांनी केला होता.
अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पथकाने बिभव कुमारला मुंबईला आणले होते. जेथे त्याने त्याचा फोन डेटा एका तज्ज्ञाच्या कॉम्प्युटरमध्ये ठेवून फॉरमॅट केला होता. मंगळवारी दिल्ली पोलिसांनी बिभव कुमार यांच्या फोनमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी मुंबईला नेले. बिभववर अटकेपूर्वी फोन फॉरमॅट केल्याचा आरोप आहे. बिभव कुमारने आपल्या फोनमधील डेटा फॉरमॅट करण्यापूर्वी त्याचा फोन डेटा मुंबईतील एखाद्या व्यक्तीकडे किंवा डिव्हाइसला हस्तांतरित केल्याचा पोलिसांना संशय आहे. बिभव कुमार यांचा फोन आणि लॅपटॉप व्यतिरिक्त दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्या आहेत.