नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्यासोबत मारहाण आणि गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरु शकते.
मात्र, आम आदमी पक्षाकडून दावा करण्यात आलाय की, ज्या ड्रॉईंग रुममध्ये मारहाण झाली त्या रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाही. दुसरीकडे दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी असाही दावा केलाय की, केजरीवाल यांच्या बेडरुममध्ये सीसीटीव्ही आहे, पण ड्रॉईंग रुममध्ये सीसीटीव्ही नाही. यामागील कारण देखील त्यांनी सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केजरीवालांच्या निवासस्थानातील सर्व सीसीटीव्ही जप्त केले आहेत. पण ज्या ठिकाणी मालिवाल यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे, त्याठिकाणी सीसीटीव्ही नसल्याचा दावा आपकडून करण्यात आलाय.
सीसीटीव्ही फुटेज डिलिट करणे किंवा डीवीआर न दिल्याचा आरोप आपने फेटाळून लावला आहे. सौरभ भारद्वाज यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे.
ते म्हणाले की, 'ड्रॉईंग रुममध्ये सीसीटीव्ही नाही. दिल्ली पोलिसांना याची माहिती आहे. ड्रॉईंग रुममध्ये मुख्यमंत्री सर्व मंत्री आणि मोठ्या राजकीय नेत्यांसोबत भेटी घेत असतात. वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांशी बोलत असतात. त्यामुळे तिथे सीसीटीव्ही लावण्यात आलेला नाही. तिथे काय चर्चा झाली हे तुम्ही रिकॉर्ड थोडीच करता. हा प्रोटोकॉल आहे.
ड्रॉईंग रुममध्ये नाही पण बेडरुममध्ये प्रायवेट सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. येथील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आला आहे. सौरभ भारद्वाज म्हणाले की, 'बेडरुममध्ये नोकर किंवा इतर कर्मचारी जातात. काही वस्तू ठेवणे किंवा घेऊन जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रायवेट सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याते आले आहेत. हा सीसीटीव्ही कॅमेरा देखील दिल्ली पोलीस घेऊन गेले आहेत.