मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटकेत असताना आता दिल्ली सरकारला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात आपमधील नेत्यांची चौकशी करण्यात येत असून आता मंत्री राज कुमार आनंद यांनी सर्वपक्षीय पदांचा राजीनामा दिला आहे. मंत्री राजकुमार आनंद यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.
मंत्री आनंद म्हणाले, आम आदमी पार्टीचा जन्म भ्रष्टाचाराविरोधातील चळवळीतून झाला आहे. पण आज तोच पक्ष भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे. या सरकारमध्ये काम करता येत नाही, याकरिता मी अस्वस्थ झालो आहे, असेही ते म्हणाले. या भ्रष्ट व्यवहाराशी आपले नाव जोडायचे नाही, असेही मंत्री राज कुमार आनंद यांनी सांगितले.
दरम्यान, मंत्री आनंद यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, केजरीवाल यांच्यासोबतचे त्यांचे नाते हे राजकारण बदलण्यासाठी चालले आहे. ते म्हणाले की, राजकारण बदलले नाही तर राजकारणी बदलले आहेत. आपण मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे राजीनामा पाठवला असल्याचे आनंद यांनी सांगितले.
मंत्री राज कुमार आनंद यांनी राजीनामा देताना मुख्यमंत्री केजरीवाल यांना खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, राजकारण बदलण्यासाठी आलेले स्वतःच बदलले आहेत असे सांगतानाच मुख्यमंत्री तुरुंगात असून दिल्ली सरकारमध्ये चेंगराचेंगरी सुरू आहे, असेही राज कुमार आनंद यांनी सांगितले.