दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी ह्या आज मंगळवारी सकाळी १० वाजता मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. स्वतः आतिशी यांनीच याबाबत माहिती दिली. त्यामुळे मंगळवारी 'आप'कडून नेमकं काय सांगितलं जाणार, याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. आतिशी यांनी स्वतः ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. आतिशी यांनी शुक्रवारी आरोप केला होता की, ईडी भाजपचं राजकीय हत्यार म्हणून काम करत आहे. ते अरविंद केजरीवाल यांचा मोबाईल मिळवून आपच्या लोकसभा निवडणुकीची रणनीती जाणून घेण्याचा प्रयत्नात आहेत.
अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी सक्तवसुली संचालनावयाने कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. एका जेल अधिकाऱ्याने सांगितलं की, अरविंद केजरीवाल यांना तिहार जेलमध्ये नेलं जाणार आणि त्यांना जेल नंबर २ मध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेलं असून एका वेगळ्या कोठडीमध्ये ठेवण्यात येणार आहे.''
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांची ईडीने चौकशी केल्यानंतर त्यांनी दोन नावं घेतल्याचं पुढे येत आहे. आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची नावे केजरीवालांनी सांगितलं जातंय. केजरीवालांनी सांगितलं की, विजय नायर हे त्यांना (केजरीवाल) रिपोर्ट करत नव्हते.
तर ते आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना रिपोर्ट करत होते. तसेच त्यांचे विजय नायरशी संबंध मर्यादित होते. विजय नायर हे 'आप'चे माजी कम्युनिकेशन-इनचार्ज आणि मद्य धोरण प्रकरणातील आरोपींपैकी एक आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी कोर्टामध्ये रामायण, महाभारत, गीता आणि पत्रकार नीरजा चौधरी यांनी लिहिलेले 'हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड' या पुस्तकांची मागणी केली आहे. सदर पुस्तके अरविंद केजरीवाल तुरुंगात वाचणार आहेत.