नवी दिल्ली : दिल्लीतून एक टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीत जपानी एन्सेफलायटीसचा पहिला रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
दिल्ली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं सगळ्या जिल्हा आरोग्य अधिकारी आणि साथरोग विशेषज्ञांना या आजाराबाबत अलर्ट केलं आहे. जपानी एन्सेफलायटीसचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच डास नियंत्रणासाठी पावलं उचलण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
जपानी एन्सेफलायटीस या तापानं पीडित पहिला रुग्ण आढळल्यानं मोठी खळबळ उडाली. ही पीडित व्यक्ती दिल्लीच्या पश्चिम विभागातील बिदापूरमधील रहिवाशी आहे. दिल्ली महापालिकेनं पीडित रुग्णाच्या घराजवळील नागरिकांचीही तपासणी केली आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीअंती रुग्ण मूळचा नेपाळचा असल्याचं समोर आलं. नुकतच ही रुग्ण महिला नेपाळहून उत्तर प्रदेशमार्गानं भारतात परतली. मात्र परत येताच ही महिला आजारी पडल्यानंतर या महिलेला जपानी एन्सेफलायटीस असल्याचं उघड झालं. उपचारानंतर महिला रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
काय आहेत जपानी एन्सेफलायटीसची लक्षणं आणि धोका
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जपानी एन्सेफलायटीस हा धोकादायक विषाणूजन्य संसर्ग आहे. हा संसर्ग डासांद्वारे पसरतो. या संसर्गाचा मेंदूवर परिणाम होतो. हा आजार संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. आजाराची लक्षणं सौम्य असतात. यात ताप, डोकंदुखी आणि उलट्या अशी लक्षणं आढळून येतात. मात्र काही गंभीर प्रकरणात मेंदूला सूज येणं, फेफरं येणं आणि कोमा जाण्यासारख्या घटनाही घडू शकतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. इतर न्यूरोलॉजिकल लक्षणं विशेषतः मुलांमध्ये अधिक सामान्य आहेत.
स्वच्छतेचा अभाव आणि डासांची उत्पत्ती झपाट्यानं होणाऱ्या परिसरात या आजाराचा धोका जास्त आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यात हा रोग पसरण्याची शक्यता असते. जपानी एन्सेफलायटीसचा मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे श्रवणशक्ती कमी होणं, शरीराच्या एका भागात कमकुवतपणा आदी समस्या होऊ शकतात. डासांच्या उत्पतींवर नियंत्रण करुन स्वच्छता राखल्यास हा धोकादायक आजार टाळता येऊ शकतो, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.