राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी पद्धतीने उपचार करण्यास दिलेली परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने 30 जून रोजी एक निर्णय घेतला होता. तो अखेर IMA अन् अन्य वैद्यकीय संघटनांच्या तीव्र विरोधानंतर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधे लिहून देण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
शैक्षणिक दर्जामध्ये मोठा फरक
पूर्वी CCMP पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना मराठवाडा मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करून काही प्रमाणात ॲलोपॅथी औषधे लिहिण्याची मुभा दिली जात होती. मात्र, IMA आणि इतर संघटनांनी याला जोरदार विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की, एमबीबीएस आणि CCMP यामधील शैक्षणिक दर्जामध्ये मोठा फरक असून, रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
डॉक्टरांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
IMA च्या म्हणण्यानुसार, अशा निर्णयामुळे ना केवळ रुग्णांचे आरोग्य धोक्यात येईल, तर ॲलोपॅथी डॉक्टरांच्या व्यावसायिक अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने आता 15 जुलैपासून सुरू होणारी नवीन CCMMP नोंदणीही तात्पुरती थांबवली आहे.
कायदेशीर कारवाईचा इशारा
या निर्णयामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथी औषधे लिहिण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार मिळणार नाही. यानंतर जर त्यांनी अशा प्रकारचा उपचार केला, तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.