कोरोना महामारीनं जवळपास सर्व जग आपल्या विळख्यात घेतलं होतं. कोरोनावर मात करत अनेकजण कोरोनामुक्त झाले, तर अनेकांनी आपले प्राणही गमावले. कोरोना व्हायरसच्या प्रकोपातून जग आणि भारत आता बऱ्यापैकी सावरला आहे. कोरोनाची भीती आता समूळ नष्ट झाली आहे. मात्र अशातच नव्या संकटाने आता डोकं वर काढलंय. केरळमध्ये निपाह व्हायरसच्या फैलावाची भीती पुन्हा एकदा सतावू लागली आहे.
मिळालेल्या माहितनुसार, कोझिकोड जिल्ह्यात निपाहच्या संसर्गामुळे दोन संशयित मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. निपाह विषाणूचा धोका लक्षात घेता, केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतलाय.
संशयास्पद मृत्यूची नोंद झाली आहे. दोन जणांना निपाह व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतांपैकी एकाच्या नातेवाईकांनाही आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. 2018 आणि 2021 मध्येही कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसच्या संसर्गामुळे मृतांची नोंद झाली होती.
निपाह व्हायरस कसा पसरतो?
WHOच्या म्हणण्यानुसार, निपाह व्हायरसचा संसर्ग प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो आणि दूषित अन्नाद्वारे किंवा थेट एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. निपाह व्हायरसची लागण झालेले लोकांना श्वसनाचे आजार आणि घातक एन्सेफलायटीस यासह विविध प्रकारचे रोग पसरवू शकतात. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी निपाह विषाणूसंदर्भात केलेल्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात 10 राज्यांत हा व्हायरस पसरत आहे.
निपाह व्हायरसची लक्षणे
निपाह व्हायरस अत्यंत घातक आहे. या व्हायरसचा संसर्ग झाल्यास २४ ते ४८ तासात रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो. सुरुवातील रुग्णांना श्वसनाचा त्रास जाणवतो. काही रुग्ण असेही आहेत ज्यांना न्यूरो संबंधित आजारांचे लक्षणे दिसून येतात.