इंजेक्शन म्हटलं की अनेकांना डोळ्यांसमोर येते ती सुई आणि त्यातून होणारी वेदना. विशेषतः लहान मुलांमध्ये ही भीती अधिक असते. अनेक वेळा केवळ या भीतीमुळे आवश्यक असलेलं लसीकरण देखील लांबणीवर जातं. अशा पार्श्वभूमीवर सुईशिवाय देण्यात येणारं इंजेक्शन आता नागपूरच्या डॉक्टरांनी देण्यास सुरु केलं आहे.
इंजेक्शन घ्यायचं म्हटलं की अनेकांना सुईची भीती वाटते. मात्र आता इंजेक्शन घेण्यासाठी सुईची भीती बाळगण्याची गरज उरलेली नाही.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , नागपूर शहरात पहिल्यांदाच सुईशिवाय देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा वापर सुरु झाला आहे. मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी लहान मुलांवर यशस्वीरित्या या तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला असून, यामुळे मुलांमध्ये इंजेक्शनची भीती दूर होत असल्याचं दिसून आलं आहे.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता सुईमुक्त इंजेक्शन देण्यास सुरुवात झाली आहे. डॉ. अविनाश गावंडे यांनी ही टेकनिक लहान मुलांवर वापरण्यास सुरुवात केली असून, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतोय. हे इंजेक्शन जेट इंजेक्शन टेक्नॉलॉजीच्या आधारे काम करतं.
यामध्ये दबावाच्या साहाय्याने औषध त्वचेखाली पाठवलं जातं. त्यामुळे यासाठी सुईची गरज भासत नाही. डॉ. गावंडे यांच्या मते, “सुईचा वापर न केल्यामुळे मुलांमध्ये इंजेक्शनची भीती दूर होते. त्याचबरोबर सुईमुळे होणारा टिश्यू ट्रॉमाही टाळता येतो. यामुळे इंजेक्शननंतर सूज येणं, जळजळ होणं, अशा समस्या देखील कमी झाल्या आहेत.” हे इंजेक्शन केवळ लहान मुलांसाठीच नव्हे तर प्रौढांसाठीही उपयुक्त ठरतं आहे.
सध्या 0.5 मिलिलिटरपर्यंत औषध याद्वारे देता येतं. जास्त प्रमाणात औषध आवश्यक असल्यास ते दोन वेळा द्यावं लागतं. हे विशेषतः लसीकरण, डोळ्यांचे किंवा त्वचेचे उपचार आणि काही विशिष्ट antibiotics सेवन देण्यासाठी उपयुक्त ठरतं.
सामान्य नागरिकांमध्येही या नव्या तंत्रज्ञानाबद्दल उत्सुकता निर्माण झालीये. अनेक पालकांनी मुलांचं लसीकरण याच पद्धतीने करण्यास प्राधान्य दिलंय. त्याचप्रमाणे सुईच्या माध्यमातून होणारे जंतुसंसर्ग, नसांना होणारी इजा किंवा इतर धोकेही टाळता येऊ शकतात.
सध्या या पद्धतीचा वापर प्रायोगिक स्वरूपात सुरु आहे. डॉ. गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 50 हून अधिक बालकांवर हे इंजेक्शन वापरण्यात आलं आहे. त्यापैकी एकही लहान मूल घाबरलं नाही. लवकरच याची अधिकृत आकडेवारी सादर केली जाणार आहे.