राज्य सरकारचा मोठा निर्णय ; नागपुरात उभारणार मिनी बॉलिवूड
राज्य सरकारचा मोठा निर्णय ; नागपुरात उभारणार मिनी बॉलिवूड
img
Dipali Ghadwaje
मुंबई : मराठी चित्रपटांचा दर्जा वाढावा, सिनेमागृहांमध्ये मराठी चित्रपट प्रेक्षकांची गर्दी व्हावी तसेच निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते यांचे मनोबल उंचवावे हेच सांस्कृतिक कार्य विभागाचे धोरण असून या सर्व बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुंनगटीवार यांनी आज मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत दिली. तसेच, मराठी चित्रपट विश्वाकरिता अनेक महत्वाचे निर्णय घेतले.

त्यामध्ये प्रामुख्याने नागपूर येथे 100 हेक्टर मध्ये भव्य चित्रनगरी उभारण्यासह अर्थसहाय्य योजनेतून निर्मात्यांना बळ देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.

त्यामुळे, आता नागपुरात मिनी बॉलिवूड उभारत असल्याचं म्हणता येईल. या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला अधिकचं बळ मिळणार आहे.  दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अर्थसहाय्या करिता दर्जा देताना अ आणि ब दर्जासह ‛क' दर्जाचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांना दुप्पट अनुदान देण्याचा आणि पुरस्कार प्राप्त महिला दिग्दर्शिकेला प्रोत्साहनपर 5 लक्ष रुपये देण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या घोषणाचा तात्काळ शासननिर्णय निर्गमित करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसेपाटील, उप सचिव महेश वाव्हळ, बाळासाहेब सावंत, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक मीनल जोगळेकर, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे आदि अधिकाऱ्यासह प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे, निर्माते संदीप घुगे, बाबासाहेब पाटील, गार्गी फुले, अशोक राणे,हेनल मेहता, जयेश जोशी, अरुण दळवी, देवेंद्र मोरे, बाळासाहेब गोरे, चंद्रकांत विसपुते, शिरीष राणे, प्रशांत मानकर आदी चित्रकर्मी उपस्थित होते. 

या बैठकीत मुंनगंटीवार यांनी मराठी चित्रपट धोरण लवकरच तयार करण्यात येणार असून त्याबाबतची समिती गठीत करण्याबाबतच्या सुचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. आपल्या राज्याला चित्रपटाचा समृद्ध वारसा लाभला आहे. आपल्या मराठी चित्रपटांचा हा वारसा जतन करण्यासाठी आगामी काळात भव्य असे मराठी चित्रपट संग्रहालय उभारणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सागितले. त्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सुचना सांस्कृतिक विभागाला दिल्या आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group