समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात समृद्धी महामार्गावर भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त नागपूरचे रहिवासी असल्याचे कळते. ते शनिशिंगणापूरला देवदर्शनासाठी निघाले होते.
नागपूरमधील भाविक शनिशिंगणापूरला देवदर्शनासाठी निघाले होते. आलिशान कारमधून ते समृद्धी महामार्गावरून जात होते. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील वानोजा गावच्या हद्दीत महामार्गावर त्यांची भरधाव कार एका धावत्या ट्रकला मागून धडकली. ही धडक इतकी जोरात होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , समृद्धी महामार्गावर लोकेशन २०७ वर कार आणि ट्रकमध्ये अपघात झाला. यात एक ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. अपघातातील मृत व्यक्ती आणि जखमी झालेले दोघे नागपूरचे रहिवासी असल्याची माहिती समजते.
या घटनेची माहिती मिळताच, शेलू बाजार, समृद्धी महामार्ग कारंजा आणि श्री गुरू मंदिर रुग्णावाहिका सेवेचे देशमुख तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यातील एकाला मृत घोषित केले. जखमींवर उपचार सुरू आहेत.