देशात मंकी पॉक्सचा अलर्ट! सर्व विमानतळांवर ‘मंकीपॉक्स’ तपासणी, आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
देशात मंकी पॉक्सचा अलर्ट! सर्व विमानतळांवर ‘मंकीपॉक्स’ तपासणी, आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
img
Dipali Ghadwaje
नागपूर : जगभरात ‘मंकीपॉक्स’चा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्यसेवा संचलनालयाने सोमवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आता राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदरांवर ‘मंकीपॉक्स’ तपासणी केली जाईल. आरोग्य विभागाला विमानतळ-बंदरांवरील आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तपासणी सुरू करावी लागणार आहे.

तसेच संशयित रुग्ण आढळल्यास त्याच्या विलगीकरणासाठी यंत्रणाही उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मंकीपॉक्सचा एक बाधित रुग्णही साथ पसरवू शकतो. त्यामुळे अशा रुग्णावर तातडीने उपचार करावे लागणार आहेत.

आरोग्यसेवा संचलनालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये, संशयितांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यात प्रत्येक बाधिताच्या संपर्कातील जवळच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करावे लागेल. रुग्णालयीन सर्वेक्षणामध्ये आरोग्य विभागाला प्रत्येक रुग्णालयातील त्वचा व गुप्तरोग विभाग, औषधशास्त्र आणि बालरोग विभागातील सर्वेक्षणावर भर द्यावा लागेल.

त्यासाठी गोवर, रुबेला सर्वेक्षण पथकांची मदत घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील जोखमीच्या लोकसंख्येच्या नियमित सर्वेक्षणातूनही या आजाराच्या संशयितांबाबत माहिती मिळणे शक्य आहे, असेही आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेत नमूद आहे.

हेही वाचा >>>> हिंदुत्ववादी संघटनांचा मोठा निर्णय ; आज मालेगाव बंदची हाक

लक्षणे काय?

मंकीपॉक्स आजारात ताप, लसिका ग्रंथी सूज, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला अशी एक वा अनेक लक्षणे दिसतात. हा सौम्य स्वरूपाचा आजार असून २ ते ४ आठवड्यात बरा होतो. लहान मुलांमध्ये आणि इतर काही जोखमीतील रुग्णांमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या आजाराचा मृत्यूदर ३ ते ६ टक्के असल्याचेही आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेत नमूद आहे.

राज्याच्या आरोग्य सेवा संचलनालयाकडून मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत. त्यांची तातडीने अंमलबजावणी केली जाईल. त्यानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वेक्षण, रुग्णाच्या विलगीकरणाची सोय यासह इतर उपाय केले जातील.

डॉ. दीपक सेलोकर, वैद्याकीय आरोग्य अधिकारी, नागपूर महापालिका.

हेही वाचा >>>> देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ : म्हणाले ,.......तर मी राजीनामा देऊन निवृत्ती घेतो
इतर बातम्या
Join Whatsapp Group