मालेगाव : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेधार्थ आज (दि. २०) मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे. श्री क्षेत्र स्मशान मारोती मंदिर येथे झालेल्या सर्वपक्षीय तसेच सर्व सामाजिक संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बांगलादेशमध्ये झालेला हिंदूंवरील हल्ला हा फक्त हिंदू धर्मियांवरील हल्ला नसून, हा हल्ला सगळ्या भारतीयांवरील आहे. बांगलादेशमध्ये झालेले बंड हे मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे.
हिंदुस्थानचे मित्र शासक असलेल्या शेख हसीना यांची भारताशी असलेली सलगी, भारत धार्जिणे धोरण आवडत नसल्यानेच बांगलादेशमध्ये असलेल्या कट्टरपंथीयांना प्रोत्साहन देऊन हे बंड घडून आणले गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याविरोधात भारत एकजुटीने उभा आहे, असे दिसले पाहिजे त्यामुळे सगळ्या संघटनांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी केले.
बैठकीला सुरेश निकम, डॉ. तुषार शेवाळे, संजय दुसाने, नीलेश कचवे, रामा मिस्तरी, मनोहर बच्छाव, किशोर इंगळे, नितीन पोफळे, जगदीश गोऱ्हे, प्रमोद पाटील, मुकेश परदेशी, दिलीप शेवाळे, जितेंद्र अहिरराव, मदन गायकवाड, राजेंद्र सूर्यवंशी, दुर्गेश कोते आदी उपस्थित होते.