मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता थेट...
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता थेट...
img
वैष्णवी सांगळे
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रदीर्घ कायदेशीर लढा देणारे कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्नल श्रीकांत पुरोहित यांना भारतीय लष्करात मोठी बढती मिळाली आहे. सशस्त्र बल न्यायाधिकरणाने दिलेल्या निकालानंतर लष्कराने त्यांना 'ब्रिगेडियर' पदावर पदोन्नत करण्यास मंजुरी दिली आहे. 

२००८ च्या मालेगाव स्फोट प्रकरणात नाव आल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे लष्करी करिअर पूर्णपणे ठप्प झाले होते. ९ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर २०१७ मध्ये त्यांना जामीन मिळाला आणि ते पुन्हा लष्करात रुजू झाले. मात्र, त्यांच्या बढतीचा आणि सेवाज्येष्ठतेचा प्रश्न प्रलंबित होता. जुलै २०२५ मध्ये मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने त्यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली. यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांना 'कर्नल' पदावर बढती मिळाली होती.

कर्नल पुरोहित यांनी आपल्या ज्युनिअर अधिकाऱ्यांच्या बरोबरीने प्रमोशन आणि इतर फायदे मिळावेत यासाठी सशस्त्र बल न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. कर्नल पुरोहित ३१ मार्च २०२६ रोजी लष्करी सेवेतून निवृत्त होणार होते, मात्र त्यांच्या निवृत्तीला आता स्थगिती देण्यात आली आहे.

भारतीय लष्कराच्या सूत्रांनुसार, ही बढती म्हणजे कर्नल पुरोहित यांच्या तुरुंगवास आणि खटल्यादरम्यान वाया गेलेल्या वर्षांची एक प्रकारे भरपाई आहे. जर त्यांची कारकीर्द व्यत्ययाविना सुरू राहिली असती, तर आज ते मेजर जनरल पदापर्यंत पोहोचले असते. आता ब्रिगेडियर म्हणून ते एका वरिष्ठ कमांडरच्या जबाबदारीत पुन्हा एकदा सक्रिय होतील. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group