मालेगाव : येथील सार्वजनिक नागरी सुविधा समिती तर्फे सरदार चौक येथे गणेश बाप्पाला सोबत घेऊन आंदोलन करण्यात आले. गणेश उत्सव काळातही मनपाकडून असमाधानकारक कामगिरी होत असल्यामुळे समाजसेवक रामदास बोरसे यांनी आज चक्क गणपती बाप्पाला सोबत घेऊन सरदार चौकात ठिय्या आंदोलन केले.
दीड महिन्या अगोदर निवेदन सादर करुन शहरातील मिरवणूक मार्गावरील जटील समस्या अवगत करुन दिल्या होत्य तरी देखील समस्यांचे अद्यापपावेतो निवारण करण्यात आलेले नसून केवळ २५% कामगिरी बजावली असून ७५% समस्या यथास्थित असल्याने रामदास बोरसे यांनी आज मनपा प्रशासनास चांगलेच धारेवर धरले.
मोकाट जनावरांचा त्रास, मिरवणूक मार्गात जागोजागी गटारीवर ढापे नसून त्या मोकळ्याच असून गुळ बाजारात केलेले डांबरीकरण पावसाचे पाण्यात वाहून जाऊन पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले शहरात कोठेही योग्य अशी साफसफाई दिसून येत नाही. अश्या अनेक समस्यांचा पाढा याठिकाणी वाचण्यात आला. गणपती स्थापनेच्या अगोदर दि. २६.८.२०२५ रोजी गुळ बाजार परीसरात मेन रोडवर मनपाकडून वंगण व रेती मिश्रण करुन डांबरीकरण करणेत आले. गणपती उत्सव काळात तरी अशा निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाची मनपा कडून अपेक्षा नव्हती. ही बोगसगिरी किती दिवस चालेल? असा सवाल आंदोलकांनी केला.
आपण कायम सांगता की, निकृष्ट दर्जाचे काम करणारावर कार्यवाही करणेत येईल. तरी वरीलप्रमाणे निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करणारे मक्तेदारावर आपण कार्यवाही केली किंवा कसे ? आजही रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत आहेत. त्यांचेपासून गणेश मूर्तीना अनवधानाने काही इजा पोहोचू शकते. तसे काही झाल्यास किंवा जीवितहानी झाल्यास मनपा अधिकारी वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा पोलीस प्रशासनाने दाखल करावा अशी देखील मागणी करण्यात आली.
मोकाट जनावरे धरुन ती पांजरापोळात किंवा कोंडवाड्यात ठेवणेत येतील व फौजदारी स्वरूपाचे गुन्हे जनावरांचे मालकांवर दाखल करणेत येतील. परंतु तसे काही झालेले दिसून येत नाही. तसेच भटक्या कुत्र्यांचाही शहरात मोठ्या प्रमाणावर वावर वाढला असून रस्त्याने चालणे लोकांना अवघड झाले आहे. गटारीवर ढापे नसल्याने नागरीक गटारीत पडतात. आदी समस्यांचे निवारण त्वरित करण्यात यावे अन्यथा गणेश विसर्जन करणार नसल्याचा इशारा याठिकाणी देण्यात आला.
मा. रामदास काका बोरसे सारख्या जेष्ठ समाजसेवकांना ह्या वयात वारंवार आंदोलन करावे लागते आणि मनपा अधिकारी बघ्याची भूमिका करत असतील अश्यात जर काकांना काही झाल्यास मनपाच्या एकही अधिकारीना फिरकू देणार नाही त्यांना काळे फसल्याशिवाय राहणार नसल्याचे देवा पाटील यांनी आंदोलन स्थळी म्हटले.
यावेळी आंदोलन स्थळी अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे, उपयुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त स्वच्छता अनिल पारखे, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे , उपअभियंता शांताराम चौरे, प्रमुख निरीक्षक स्वच्छता एकबाल जान मोहम्मद आदी अधिकारींनी भेट देऊन दोन दिवसात मागण्या पूर्ण करण्याच्या अश्वासणावर आंदोलन स्थगित करण्यात आले.