बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, 14 पोलिसांसह 97 जणांचा मृत्यू
बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, 14 पोलिसांसह 97 जणांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
बांगलादेशात आरक्षणाच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. मागील काही दिवसांपासून शांत असलेले आंदोलन पुन्हा हिंसक बनलं आहे. आंदोलक आणि सत्ताधारी अवामी लीगच्या समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात 14 पोलिसांसह 97 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. बांगलादेशातील उच्चायुक्ताने तेथील भारतीय नागरिकांना संपर्कात राहण्यास आणि सतर्क राहण्यास सांगितले आहे.

बांगलादेशात कर्फ्यू लागू

बांगलादेश सरकारने चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बांगलादेशात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. आंदोलक विद्यार्थी सातत्याने पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या सैनिकांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. माजी सैनिकांसाठीचं हे आरक्षण रद्द करण्यासाठी काही दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये पोलीस आणि विद्यार्थी आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

"आंदोलक विद्यार्थी दहशतवादी"

पंतप्रधान शेख हसीना यांनी रविवारी महत्त्वाची बैठक बोलावली होती. दरम्यान बांगलादेशच्या विविध भागात हजारो लोक जमले आणि शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले. त्यानंतर परिस्थिती चिघळली. यावर शेख हसीना यांनी म्हटलं की, आंदोलनाच्या नावाखाली सरकारी मालमत्तेचे नुकसान करणारे विद्यार्थी नसून दहशतवादी आहेत. मी देशवासियांना आवाहन करतो की अशा लोकांना जोरदार प्रत्युत्तर द्या. या बैठकीत लष्कर, नौदल, हवाई दल, पोलीस आणि सुरक्षा विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बांगलादेशमधील स्थानिक माध्यमांच्या मते, रंगपूरमध्ये अवामी लीगचे चार समर्थक ठार झाले आणि 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर बोगरा आणि मागुरा येथे प्रत्येकी दोन जण ठार झाले, त्यात विद्यार्थी पक्षाच्या नेत्याचाही समावेश आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group