मुंबई : विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी संघबांधणीला सुरुवात केली आहे. अनेक नेत्यांचे राज्यात दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. यादरम्यान आता महायुतीमधील अंतर्गत धुसफूस समोर येऊ लागली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी रामदास कदमांना दिला इशारा
"रामदास कदम हे वारंवार अशा पद्धतीने टोकाचं बोलतात. त्यामुळे आमची मनंही दुखावली जातात. शेवटी आम्हीही माणसं आहोत. त्यांच्या विधानाला उत्तरादाखल बोलताना आम्हालाही ५० गोष्टी बोलता येतील. पण जे मोठे नेते आहेत, त्यांनी काहीतरी पथ्य पाळलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाला वारंवार अशा प्रकारचं बोलणं आम्हाला मान्य नाही. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलेल", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते रामदास कदम?
"मुंबई-गोवा मार्गावर खड्डे पडले आहे. परंतु चमकोगिरी करण्यासाठी पाहाणी दौरा केला जात आहे. हे पाहणी दौरेकशासाठी? खरेतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घ्यायला हवा. ते अत्यंत कुचकामी मंत्री आहेत", अशी टीका रामदास कदम यांनी केली होती.