राज्याच्या राजकारणात दसऱ्याला होणारे दसरे मेळावा चर्चेचा विषय असतो. त्यात मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांचा दसरा मेळावा पार पडला. दोन्ही मेळाव्यात दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. या मेळाव्यात भाषण करताना शिंदेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावा केला.

रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत खळबळजनक दावा करताना सांगितले की, 'शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता.', याची माहिती काढण्यात यावी अशी मी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती करतो. मी बाळासाहेब यांच्याबाबत हे विधान जबाबदारीने करत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर हातांचे ठसे घेण्यासाठी त्यांचा मृतदेह २ दिवस तसाच ठेवण्यात आला होता. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर आहेत. त्या डॉक्टरांना विचारून घ्या. २ दिवस त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर का ठेवला होता. त्यांचे अंतर्गत काय चाललं होतं?', असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. त्यांच्या या विधानाने मात्र आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
'ये तो झाकी है, अभी बहोत कुछ बाकी है. आमच्या मुळावर उठणार तर आम्ही बोलणारच. अजून खूप काही बाकी आहे. आम्ही हळूहळू सगळं बोलणार आहोत. हे तर काहीच नाही आहे. जेवढे माझ्या मुलाच्या मागे लागणार तेवढं मी अजून बोलणार. शिवसेना आम्ही वाढवली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली नाही. माझ्या मुलाच्या मागे लागताय. राजीनामा मागताय. त्याला टार्गेट करतात.हे सर्व सूड भावनेने तुम्ही वागत आहात.'