गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे. या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. कारवाई करत मुली ताब्यात घेतल्या. हा एक डान्सबार आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी विधानपरिषदेत केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. परबांनी केलेल्या आरोपांवर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी 'सावली बार माझ्याच पत्नीच्या मालकीचा आहे' अशी कबुली दिली. तसेच अनिल परबांवर टिका केली.
या प्रकरणावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'होय, सावली बार आमच्याच मालकीचा आहे. बारची मालकी माझी पत्नी ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. मात्र, बार चालवणारा दुसराच व्यक्ती आहे. शेट्टी बार चालवायचा, त्याला आम्ही काढून टाकले आहे. बार आम्ही बंद केलं आहे', असं रामदास कदम म्हणाले आहेत. जो कायदा आहे. त्यानुसार जो चालवणारा इसम जबाबदार असतो. त्याला जबाबदार धरलं. हॉटेल काढून घेतलं. लायसन्स रद्द केलं आहे. हॉटेल बंद केलं आहे. यापेक्षा अजून नैतिक काय करायचं? असा सवाल यावेळी कदम यांनी केला आहे.
'नियमानुसार बार चालवणाऱ्यावर कारवाई होत असते. करारानुसार, बारमध्ये काही झाल्यास बार चालवणाराच जबाबदार असतो', असंही रामदास कदम म्हणाले. '१९९० साली बार सुरू करण्यात आलं. माझ्या पत्नीच्या नावे ३० वर्षांपासून परवाना आहे. व्यवसाय चालवणं हा गुन्हा आहे का? अनिल परब हे अर्धवट ज्ञान असलेले वकील आहेत', अशी टीकाही कदमांनी केली.