ठाकरे-फडणवीस एकत्र ! भविष्यातील राजकारण बदलाचे हे संकेत आहे का?
ठाकरे-फडणवीस एकत्र ! भविष्यातील राजकारण बदलाचे हे संकेत आहे का?
img
Jayshri Rajesh
महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन म्हणून पाहिल्या जाणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत सुरुवात झाली. कालच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापल्या पत्रकारपरिषदांमध्ये परस्परांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटूता पाहायला मिळेल, असा अंदाज होता. 

आज मात्र सकाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी एक वेगळेच पण सुखद  चित्र पाहायला मिळाले. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. ते विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आले होते.

 चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना एक  चॉकलेट दिले. यावेळी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे आणि अनिल परब हेदेखील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील दालनात येताच या सर्व नेत्यांमध्ये संवाद सुरु झाला. चंद्रकांत पाटील दालनात आल्यावर अंबादास दानवे यांनी त्यांच्यासमोर पेढ्याचा बॉक्स धरत.दादा लोकसभा निवडणुकीत आमचे 31 खासदार निवडून आले म्हणून आम्ही पेढे वाटत आहोत,असे अंबादास दानवे यांनी म्हटले. 

चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा देत म्हटले की, मी यांचा पेढा आधीच वाटतो. ठाकरे गटाचे अनिल परब हे नुकतेच मतदान पार पडलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला उभे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे किरण शेलार रिंगणात आहेत. या निवडणुकीचा निकाल 1 जुलैला जाहीर होईल. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचे अगोदरच अभिनंदन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

ठाकरे आणि फडणवीस एकाच लिफ्ट मध्ये 

आज विधिमंडळात एकाहून एक धक्कादायक घटना पाहायला मिळाल्या . विधिमंडळात लिफ्टपाशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेते एकाचवेळी येऊन थांबले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जुजबी संवाद झाला. लोकसभा निवडणुकीत ठाकरे आणि फडणवीस यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील  झालेला हा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे.

विधान भवनाच्या पायऱ्यांवर आधी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन, घोषणाबाजी केली. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे विधान भवन परिसरात दाखल झाले. त्यानंतर विधान भवनात जे चित्र दिसलं, त्यावरून भविष्यातील बदलाचे हे संकेत आहे का? याव राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group