दसरा मेळाव्यात शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. बाळासाहेब ठाकरे यांचा देह दोन दिवस का ठेवला, बोटाचे ठसे का घेतले असे प्रश्न उपस्थित करत शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी आरोपांची राळ उडवून दिली. राजकीय पटलावर यामुळे मोठी खळबळ उडाली. त्याला आज ठाकरे सेनेच्या कॅम्पमधून प्रखर उत्तर मिळाले. अनिल परब यांनी कदमांवर मोठा बॉम्ब टाकला. अनिल परबांच्या वादळी पत्रकारपरिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. रामदास कदमांच्या बायकोनं जाळून घेतलं की जाळलं हा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी म्हटलं की, रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट कराच, पण त्यासोबत ज्योती रामदास कदम यांनी १९९३ मध्ये जाळून घेतलं की जाळलं? त्याबाबतही नार्को टेस्ट करण्याची मागणी मी करतो. गृहराज्यमंत्र्यांच्या (योगेश रामदास कदम) आईने पेटवून घेतलं होतं. रामदास कदमांच्या मुलानेच त्याची चौकशी करावी. १९९३ च्या घटनेची चौकशी झालीच पाहिजे. त्याची चौकशी झालीच पाहिजे.
खेडमध्ये धुमाकूळ सुरू आहे. जमिनी बळकावल्या, लोकांना त्रास दिला जातोय, या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत. रामदास कदम यांना मुख्यमंत्री का पाठीशी घालत आहेत? असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला. मुंबई मनपा त्यांची होऊ शकत नाही. त्यामुळे रामदास कदम यांना पुढे करायचे अन् मूळ मुद्द्यापासून दूर करायचं. शिशूपाल यांचे आता १०० गुन्हे पूर्ण झाले आहेत. त्यांचे सर्व पुरावे येणाऱ्या अधिवेशनात दाखवणार आहे.
मुख्यमंत्री यांना इतके पाठीशी का घालतात? यांच्यामुळे मुख्यमंत्री डागाळलेले आहेत. ते वाळूचोर, माफियांना का वाचवत आहेत? माझा सवाल आहे. रामदास कदम यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावर माफी मागावी लागणार आहेच, अन्यथा कोर्टाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपातील सत्य बाहेर आलेच पाहिजे? असे अनिल परब म्हणाले.