राजकीय नेते एकमेकांवर ताशेरे ओढण्याचे काम करतच असतात हे काही नवीन नाही पण आता थेट विधानपरिषदेतच एकमेकांना धमक्या देण्याचं काम सुरु आहे. गल्लीत भांडणं व्हावी तशी आता विधानपरिषदेत होऊ लागली आहे हेच शंभूराज देसाई आणि अनिल परब यांच्यातील वादाने पुन्हा एकदा समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासामध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावरून थेट कर्मचाऱ्यांना बॉक्सिंग टाईप हाणामारी केल्यानंतर आज (10 जुलै) विधान परिषदेमध्ये शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे एकमेकांना धमकी देण्यापर्यंत पोहोचल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी लोकप्रतिनिधींच्या वर्तनावरून मान खाली गेली आहे.
मराठी माणसाला मुंबईत घरांसाठी आरक्षण मिळावं या मुद्यावरून राज्य सरकारचे मंत्री, शिवसेना नेते शंभुराज देसाई आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब विधानपरिषदेत आमने-सामने आले. मराठी माणसाला घर मिळालं पाहिजे ही सरकारची इच्छा आहे, मराठी माणसाची इच्छा आहे. मात्र तसा कायदा आहे का? तसा कायदा करा अशी मागणी अनिल परब यांनी केली. यावरून या सर्व वादाला सुरुवात झाली.
बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास
अनिल परब यांनी मराठी माणसांच्या मुद्यावरून बोलताना शंभूरा देसाई यांनी गद्दारी केली असा उल्लेख करताच शंभूराजे यांचा पारा चांगला चढल्याचे दिसून आलं. त्यानंतर त्यांनी तू गद्दार कोणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास असा एकेरी उल्लेख करत अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामुळे या दोघांच्या वादामध्ये विधान परिषदेचे काम दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.विधान परिषदेमध्ये मराठी माणसांच्या घरांवरून ही चर्चा सुरू होती आणि या चर्चेमध्ये अनिल परब, अंबादास दानवे, प्रसाद लाड, अनिल परब, राजेश राठोड, हेमंत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी यांनी सहभाग घेतला होता. मराठी माणसांच्या मुद्द्यावरूनच चर्चा सुरू असतानाच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि एकमेकाला आव्हान देण्याची भाषा सुद्धा झाली.