"मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्याच नाहीत", ड्रग्ज प्रकरणावरुन चंद्रकांत पाटील यांचा कोणावर निशाणा?
img
Dipali Ghadwaje
पुणे  : भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे पुण्याचे विद्यमान पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्यातील ड्रग्न प्रकरणावरुन निशाणा साधला होता. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केल्यानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर हे चंद्रकांत पाटील यांच्या मदतीला धावून आले. 

हॉटेलमधील ड्रग्जचे व्हिडीओ समोर आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, मी पालकमंत्री असताना कधी अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नाहीत, ज्याबद्दल सर्वजण चिंता करतील. अशा गोष्टी घडल्या आहेत का? असा सवाल करत खरे तर आठवतही नाही. तुम्हालाही आठवत नसेल, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला. पण त्यांना आपली चूक लक्षात येताच बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. 

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला. अमोल मिटकरी यांनी ट्वीट करताना म्हटले की, चंद्रकांत पाटील तुम्ही पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत, कारण तुमच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजित पवार हे पालकमंत्री झाल्यामुळे या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील व्यथीत झाले आहेत, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी ड्रग्ज प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.

अमोल मिटकरी यांच्या आरोपावर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, अमोल मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे. अमोल मिटकरी बाष्कळ बडबड करतात. त्यांना समज देण्याची गरज आहे. महायुतीला तडा जाईल, असे वक्तव्य त्यांनी करू नये. आपण एखादी गोष्ट बोलून जाता आणि ती महायुतीसाठी हानिकारक ठरते, अशी समज देण्याचा प्रयत्न प्रवीण दरेकर यांनी केला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group