नांदगाव मध्ये शिवसेना शिंदे गटाने नगरसेवकाची जागा बिनविरोध निवडून येऊन आपलं खात उघडलं. तर दुसरीकडे भाजपने संपूर्ण नगरपरिषदेतच बिनविरोध निवडून येत खातं उघडलं आहे. दोंडाईचा नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर यंदा पहिल्यांदाच निवडणूक होणार होती. मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगराध्यक्षांसह सर्व 26 जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
दोंडाईच्या नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल या बिनविरोध निवडून आल्या आहेत. संपूर्ण बिनविरोध ठरणारी दोंडाईचा नगरपरिषद ही राज्यातील पहिलीच नगरपरिषद ठरली आहे.
राज्यात भाजपचे तीन नगराध्यक्ष बिनविरोध
नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या मतदानाआधीच भाजपचे तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आलेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंयायत, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आणि जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेत अध्यक्षपदी भाजप नेत्यांची बिनविरोध वर्णी लागली आहे.
दोंडाईच्या नगराध्यक्षपदी भाजप नेते जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. सोलापूर अनगर नगरपंचायतीमध्ये भाजप नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. तर जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचीही बिनविरोध निवड झाल्याने भाजपने विजयी जल्लोष केला