शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप कमलेश कटारिया यांनी केलाय. अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
सिल्लोडमधील भाजप संपवण्यासाठी अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील कमलेश कटारिया यांनी केला आहे. अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्याच्या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र दिलं आहे.
जालना लोकसभा मतदारसंघात सत्तारांनी काँग्रेसला मदत केल्याचा आरोप
जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस नेते डॉ. कल्याण काळे यांनी त्यांचा पराभव केला आहे. काळेंच्या विजयात अनेक अदृश हातांची मदत झाल्याचे बोलले जात आहे. यामध्ये शिवसेनेचे राज्यातील अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव घेतले जात आहे. अब्दुल सत्तार यांची आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी त्यांच्या सिल्लोड येथील संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली. तेव्हा सत्तार यांनी काळेंचे अभिनंदन करत डोक्यावर हात ठेवला होता. एवढेच नाही तर काळे माझे चांगले मित्र आहेत, त्यांना मी निवडणुकीत मदत केल्याची जाहीर कबुलीही सत्तार यांनी दिली होती. या घटनेनंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेत सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
अब्दुल सत्तार आणि काँग्रेसच्या नेत्यांमधील जवळीक वाढली
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर अब्दुल सत्तार आणि काँग्रेसच्या नेत्यांमधील जवळीक वाढू लागली आहे. काँग्रेसचे जालन्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी नुकतीच अब्दुल सत्तार यांची त्यांच्या सिल्लोड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली होती. भोकरदन शहराला खडकपूर्णा योजनेतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी या भेटीत सत्तारांकडे केली. त्यांनी ही मागणी मान्य करुन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळं सत्तार पुन्हा काँग्रेसची वाट धरणार का? असा सवालही यानिमित्तानं उपस्थित केला जात आहे.