छ. संभाजीनगर (भ्रमर वृत्तसेवा) :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर तीन वर्षांत पैसा पंधरा पटीने वाढवून देण्याचे आमिष दाखवून, मनी प्लँट ग्रोथ या कंपनीच्या माध्यमातून तब्बल १९ जणांना ७५ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला.
ही फसवणुकीची घटना 22 सप्टेंबर 2020 ते 31 जानेवारी 2023 दरम्यान सेव्हन हिल येथील रघुवरी चेंबर येथे घडली. फसवणूक करणार्याचे नाव संतोष तुकाराम कोकाटे (रा. प्राईड इनिग्मा फेस 1, सुतगिरणी चौक, गारखेडा) असे आहे. संतोष कोकाटे हा मनी प्लॉट ग्रोथ कंपनी मालक आहे.
या प्रकरणात माजी सैनिक दत्तू यादवराव थोरात (वय 59, रा. नंदिनीनगर, गारखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दत्तू थोरात हे सन 1985 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. सन 2015 मध्ये सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर ते माजी सैनिक महामंडळात नोकरीला होते. सप्टेंबर 2020 मध्ये फेसबुकवर मनी प्लॅट ग्रोथ कंपनी शेअर मार्केटिंगच्या करून ठेवीदारांना रकमेवर तीन वर्षांत दामदुप्पट करून देत असल्याची माहिती मिळाली.
अधिक माहितीसाठी ते सेव्हन हिल परिसरातील रघुवीर चेंबर्स येथील कार्यालयात गेले. येथे दत्तू थोरात यांची भेट कंपनीचा मालक संतोष कोकाटे याच्याशी झाले.संतोष कोकाटे याने मनी प्लॉट ग्रोथ या कंपनीच्या एकूण कामाबाबत माहिती दिली. तीन वर्षांत या कंपनीत गुंतवलेली रक्कम दुप्पट नव्हे, तर पंधरा पटीने वाढेल, असे आमिष दाखविले. कोकाटे याने यापूर्वी अनेक गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिल्याचे सांगत विश्वास संपादन केला.
त्यानंतर थोरात यांनी वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण 13 लाख 50 हजार रुपये रोख स्वरूपात गुंतवले. त्याबदल्यात कोकाटे याने एचडीएफसी बँकेचे पोस्टडेटेड चेक, तसेच नॉन-ज्युडिशियल स्टॅम्पवर प्रॉमिस नोट्स दिल्या; मात्र दिलेल्या तारखेला चेक वटविण्यास गेले असता कार्यालय बंद असल्याचे आणि कोकाटे बेपत्ता झाल्याचे समोर आले.