इशारा करुनही गाडी न थांबवल्याने आणि धक्का मारुन गाडी घेऊन गेल्याच्या रागातून तीन वाहतूक पोलिसांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूजमध्ये एका चौकात ही घटना घडली असून यावर सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
चौकामध्ये इशारा करुनही वाहन न थांबवल्याने आणि धक्का मारून गाडी घेऊन गेला म्हणून एका ड्रायव्हर तरुणाला तिघा पोलिसांनी बेदम मारहाण केली. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीबद्दल पोलिसांवर संताप व्यक्त केला जात आहे.
वाळूज औद्योगिक परिसरातील एनआरबी चौकामध्ये २६ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजेदरम्यान एक टाटा एस गाडी चालक न थांबता पोलिसांना धक्का पुढे गेला असे सांगितले जात आहे. त्यावरूनच तीन पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली.
जर ड्रायव्हर तरुणाची चूक असेल तर पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेलं पाहिजे होतं. मात्र तीन पोलिसांनी भररस्त्यात अमानुषपणे त्यांना मारहाण केली. शिवाय याची तक्रार ही वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेतली नाही याऊलट त्या तरुणाची गाडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षकांनीही कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे