'आमचं काहीच ठरलं नव्हतं' ; मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठ्ठं विधान
'आमचं काहीच ठरलं नव्हतं' ; मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठ्ठं विधान
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती बाजी मारणार, हे स्पष्ट झाल्यानंतर आता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच महायुतीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण, याबाबत चर्चा रंगली होती. मात्र, भाजपसह महायुतीने विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाईल, अशी भूमिका घेतली होती.

मात्र, भाजपने 100 जागांचा आकडा ओलांडल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा भक्कम झाला आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत जाहीर चर्चा सुरु केली आहे.

या पार्श्वभूमीवर आता विद्यमान मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांच्या भूमिकेला छेद देणारे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्रि‍पदाबाबत आमचं काहीच ठरलं नव्हतं, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

महायुतीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्याचा मुख्यमंत्री, असं आमचं काही ठरलं नव्हतं. प्रथम निवडणुकीच्या निकालाचे अंतिम आकडे येऊ दे. मग आम्ही तिन्ही पक्ष ज्याप्रमाणे जागावाटपाच्या चर्चेसाठी बसलो होतो, त्याप्रमाणे एकत्र बसू. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील. आम्ही जशी निवडणूक लढलो तसा मुख्यमंत्रीपदाबाबतही एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यामुळे ते मुख्यमंत्रि‍पदावरील दावा सहजासहजी सोडणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत. मात्र, भाजपला महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळाल्याने देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक पुन्हा एकदा प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्रि‍पदाच्या निवडीवरुन महायुतीमध्ये तिढा निर्माण होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group